सातारा : महिला व बालविकास विभागाकडून महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी व हक्कांचे रक्षण करण्यासाठी महिला सक्षमीकरण केंद्र व सखी वन स्टॉप सेंटर्स कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील गरजू महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सातारा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये महिला सक्षमीकरण केंद्र कार्यरत आहे. सखी वन स्टॉप सेंटर हे शासकीय पुरुष भिक्षेकरी गृह, सातारा व कराड येथे भेदा चौक धान्यबाजाराजवळ आशा किरण महिला वसतिगृहात कार्यरत आहे.
महिला सक्षमीकरण केंद्राद्वारे महिलांसाठी आर्थिक, सामाजिक, सक्षमीकरणासाठी असलेल्या योजना, उपक्रम, समुपदेशन, सामाजिक सुरक्षितता, मार्गदर्शनाबरोबर ग्रामीण स्त्रियांना त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी योजलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करणे, पंचायतराज संस्था व अंगणवाडी सारख्या इतर ग्रामीण स्तरावरील संस्थांच्या कामकाजामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, विविध कार्यक्रमांतर्गत तळागाळातील महिला बचत गट इतर समुहामध्ये समन्वय साधने इ. कामकाज करण्यात येते.
केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या सखी वन स्टॉप सेंटर अंतर्गत प्रवेशितांची परिस्थिती हाताळणे, संकटांच्या ठिकाणावरून त्यांची सुटका करणे, गृह चौकशी करणे, कुटुंबात पुनर्स्थापना करणे, रुग्णालयात, न्यायालयात व पोलीस ठाण्यात व इतर आवश्यक ठिकाणी ने-आण करणे, तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची सोय करणे इत्यादी कामे करण्यात येतात.