माण : माण तालुक्यातील कुळकजाई येथील रमेश मारुती इंगळे (वय 53) यांचा मृतदेह शिवारात आढळून आला. अज्ञाताने त्यांच्या डोक्यात गंभीर मारहाण करुन त्यांचा मृतदेह शेतात नग्नावस्थेत फेकून दिला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रमेश मारुती इंगळे हे मंगळवारी (दि. 4) रोजी रात्री 10 वाजेपर्यंत कुळकजाई गावातच होते. त्यानंतर घरी जायचे म्हणून गावातून निघाले मात्र ते घरी पोहचलेच नाहीत. त्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.05) रोजी दुपारी साडेतीन वाजता दिलीप एकनाथ घाडगे हे आपल्या शेतात कामानिमित्त आले असता त्यांना शेतात मृतदेह नग्नावस्थेत पडलेला आढळून आला.
यानंतर कुळकजाईच्या पोलीस पाटलांना कळवले. पोलीस पाटील घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दहिवडी पोलिसांना ही घटना कळवली. दरम्यान कुळकजाई आणि पंचक्रोशीतील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो रमेश इंगळे यांचाच असल्याची खात्री पटली.
घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांचे सहकारी पोहचल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवून दिला. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर याबाबत अधिक तपास दहिवडी पोलीस करत आहेत.