नांदेड : राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचेही काम सुरू आहे, असा आरोप करत सोमवारी मराठवाड्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केले. नांदेड, धाराशिव, लातूरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या प्रवाशी भाडे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भाडेवाढ लागू झाली असून, या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे काही ठिकाणी पडसाद उमटत असून, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भाडेवाढीच्या विरोधात आंदोलन केले आहे. नांदेड, लातूर व धाराशिवमध्ये ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.
अचानक सुरू केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर बसच्या रांगा लागल्या होत्या. त्याच बरोबर प्रवाशांचा देखील खोळंबा झाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान एसटीची भाडेवाढ रद्द करण्यात यावी; अन्यथा यापुढं देखील दरवाढी विवरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे. यावेळी शहरातील बस स्थानकाच्या समोर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, तर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले. एकीकडे लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातात. तर दुसरीकडे एसटी बसची भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोप या शिवसैनिकांनी केला. नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 आगारांसमोर हे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे 15 टक्के भाडेवाढ केल्यामुळे आता प्रवाशांसोबत राजकीय पक्ष देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर एसटी बस आडवत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केल आहे. यावेळी काहीकाळ बस देखील शिवसैनिकांनी रोखून धरल्या होत्या. तात्काळ भाडेवाढ निर्णय रद्द करावा, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे. एसटी दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे.
याच पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी सहभाग नोंदवला.