वाई : वाई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी आठ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.
राज्य शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेतून बाजार समितीच्या आवारातील शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी अनुदान दिले जाते. वाई बाजार समितीच्या शेतकरी भवनाची दुरावस्था झाली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. त्यानुसार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने शेतकरी भवन दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. समितीने अस्तित्वातील शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी ३२ लाख ३६ हजार ९१६रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. त्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच त्यासाठी राज्य शासनाकडून ८ लाख ९ हजार २२९ रुपये शासन अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला आहे. या निर्णयाचे वाई तालुक्यात सर्वत्र स्वागत होत असून मंत्री मकरंद पाटील यांचे आभार मानले आहेत.