सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याला फलटण येथील न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. संपदा मुंडे या महिलेने फलटण शहरातील हॉटेल मधुदीपच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. २४ ऑक्टो. रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण शहरासह सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. संबंधित मृत डॉक्टरने आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच संबंधित महिला ज्या ठिकाणी भाड्याने राहत होती. तेथील घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानेही त्रास दिल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये केला होता.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने तसेच प्रशांत बनकर याच्यावर फलटण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी यातील आरोपी प्रशांत बनकरला अटक केली होती. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने काल रात्री फलटण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर राहत अटक करून घेतली होती. पोलिसांनी त्याला काल रात्री अटक केल्यानंतर आज संध्याकाळी फलटण येथील न्यायालयामध्ये हजर केले असता तपासाच्या अनुषंगाने फलटण येथील न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.