फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

कंपनीच्या व्यवस्थापकाला कार्यकर्त्यांनी खडसावले

by Team Satara Today | published on : 31 July 2023


सातारा : शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावरील फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सोमवारी तीव्र आंदोलन केले. गाडीचा हप्ता थकीत राहिला म्हणून जबरदस्तीने गाडी ताब्यात घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी कंपनी कार्यालयात जाऊन व्यवस्थापकाला चांगला जाब विचारला. संबंधित व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अखेर माफी मागितली.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवसेनेच्या जावली तालुका महिला संघटक आपल्या चारचाकी गाडीतून शैक्षणिक कामासाठी साताऱ्यात आल्या होत्या. पोवई नाका परिसरात एका टोळक्याने त्यांची गाडी अडवून तुमची गाडीचे हप्ते थकीत आहेत त्यासाठी गाडी ताब्यात घ्यावी लागेल, असे म्हणत जबरदस्तीने गाडीचा ताबा मिळवला व गाडी कंपनीत आणण्याऐवजी थेट महामार्गावर नेऊन उभी केली. भयभीत झालेल्या गीता शेलार यांनी या प्रकाराची कल्पना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना दिली.
सचिन मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट पोवई नाक्यावरील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात येऊन संबंधित व्यवस्थापक आणि वसुली कर्मचाऱ्यांच्या विरोधात जोरदार आगपाखड केली. कोणत्या नियमाच्या आधारे तुम्ही या गाडीचा ताबा घेतला, याचे पण आत्ताच्या आत्ता उत्तर हवे आहे असे मोहिते यांनी खडसावताच व्यवस्थापकाने सारवासारवीचा प्रयत्न केला. संबंधित कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधातही मोहिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांमध्ये कंपनीच्या विरोधात थेट अपहरणाची तक्रार देतो, असारा इशारा देताच संबंधित व्यवस्थापक आणि कर्मचारी यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. साताऱ्यातील फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मोहिते यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात शनिवारी जिल्हास्तरीय उद्योजकता मेळावा
पुढील बातमी
धोम धरणातून सोडण्यात आले पाच हजार क्युसेक पाणी

संबंधित बातम्या