मुंबई : मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध नाटककार आणि ‘वस्त्रहरण’सारख्या गाजलेल्या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालंय. दहिसर येथील खासगी रुग्णालयात सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गवाणकर हे कोकणातील सुपुत्र आणि मराठी रंगभूमीवरील एक मोठं नाव होतं. त्यांनी ‘वस्त्रहरण’, ‘दोघी’, ‘वनरूम किचन’, ‘वरपरीक्षा’, ‘वर भेटू नका’ अशी अनेक लोकप्रिय नाटके लिहिली. त्यांच्या लेखनातून ग्रामीण बोलींना आणि विशेषतः मालवणी भाषेला नवी ओळख आणि उंची प्राप्त झाली. गंगाराम गवाणकर यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाने महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या लेखनातील विनोद, वास्तव आणि संवादशैलीने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनीदेखील या नाटकाची विशेष प्रशंसा केली होती.
गवाणकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1971 साली केली. एमटीएनएलमध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी नाट्यलेखनाचा छंद जोपासला. त्यांच्या अनेक नाटकांनी मराठी रंगभूमीला नवा आत्मा दिला. त्यांनी 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते, ही त्यांच्यासाठी मोठी गौरवाची बाब ठरली.
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी रात्र 10 वाजून 40 मिनिटांनी निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी B/401,पारिजात,परबत नगर, चांडक(निषचंय)जवळ, एस. व्ही. रोड,दहिसर (पूर्व), mumbai-400068 येथे नेण्यात येणार आहे.अंतिम संस्कार दहिसरच्या अंबावाडी, दौलत नगर स्मशानभूमी करण्यात येणार आहेत.
मागील काही महिन्यांपासून त्यांची तब्येत खालावलेली होती. अखेर वयोमानानुसार आलेल्या आजाराशी झुंज देत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवर एक पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज दहिसर येथील अंबावाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.मराठी रंगभूमीने आज एक प्रतिभावान, प्रांजळ आणि मातीशी जोडलेला नाटककार गमावला आहे.