सातारा : सातारा शहराचे 597 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मांडले जाणार आहे. या अंदाजपत्रके सभेच्या आढावा बैठकीत बुधवारी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह सर्व सभापतींनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. शहराच्या विकासामध्ये कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिला. कामांचे हिशोब आणि झाडाझडती यामुळे स्थायी समितीची पहिलीच सभा अत्यंत वादळी ठरली.
स्थायी समितीची पहिली बैठक बुधवारी सकाळी सातारा पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये झाली नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर, नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, शिक्षण सभापती शंकर किर्दत, दुर्बल घटक विशेष कल्याणकारी सभापती संकेत साठे, मुख्याधिकारी विनोद जळक, उपमुख्य अधिकारी अरविंद दामले तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या सभेत प्रामुख्याने शहर विकास आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावरून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीनंतर रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेत संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
नगराध्यक्ष अमोल मोहिते व बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून संबंधित विभागाची चांगलीच कानउघाडणी केली. 597 कोटी रुपयांचे बजेट याचा आढावा या बैठकीत घेतला जात असताना सर्वसाधारण सभेप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांची सुमारे दोन ते अडीच तास झाडाझढती सुरू होती. करवसुलीसाठी मोठी यंत्रणा असताना शहराची कामे प्रलंबित का राहतात टेंडर वरचे कर्मचारी असताना सुद्धा कामे वेळेवर होत नाहीत अशा तक्रारी सभापतींनी करत सातारा शहराच्या विकास कामात कोणतीही कर्तव्य कसुरी चालणार नाही अन्यथा कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशारा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिला.