कराड : थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात कर्जदाराने 11 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच ती न दिल्यास एक महिन्याची साध्या कैदेची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. व्ही. भागवत यांनी ठोठावली आहे.
विकास कृष्णत सूर्यवंशी यांनी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था शाखा रुक्मिणीनगर, कराड येथून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी कर्जदाराने आय. डी. बी. आय. बैंक शाखा कराड वरील रक्कम रु. 6,900 रूपयांचा धनादेश दिला होता. सदर धनादेश वठविण्यासाठी भरला असता तो न वठल्याने संस्थेने कर्जदारास नोटीसद्वारे चेकच्या रकमेची मागणी केली होती. मात्र कर्जदाराला नोटीस प्राप्त होऊनही त्याची पूर्तता करण्यात आली नव्हती. त्यामुळे जनकल्याण पतसंस्थेने कर्जदाराविरुध्द धनादेश न वटल्याबाबत कोर्टात पुराव्यासह तक्रार दाखल केली होती.
या खटल्याच्या कामकाजावेळी दोन्ही बाजूच्या युक्तीवादा झाला होता. न्यायाधिश एम. व्ही. भागवत यांच्यासमोर अंतिम सुनावणी होऊन त्यांनी याप्रकरणी कर्जदारास दोषी ठरवून 11 हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला आला. तसेच नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी संस्थेकडून वरिष्ठ अधिकारी सुरेश शिंदे काम पाहिले. तर अॅड. मंजिरी जाखलेकर व अॅड. विक्रम कुलकर्णी यांनी संस्थेची बाजू मांडली.