सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून फतवा जाहीर झाला असून 20 मार्चपूर्वी या निवडी केल्या जाव्यात असे परिपत्रक ग्रामविकास मंत्रालयाचे प्रमुख सचिव बा. म.आसोले यांनी काढले आहे. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना तातडीने राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी यांनी युती करत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना शिंदे गटाला विरोधी बाकावर बसवले आहे .रायगडचा तिढा सुटला तरी सातारा जिल्ह्यातील महायुतीचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना व राष्ट्रवादी यांचे सर्व जिल्हा परिषद सदस्य हे महाराष्ट्राच्या बाहेर सहलीवर असून कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी असले तरी मुंबईतून महायुतीतील वरिष्ठांशी बोलून सातारा जिल्ह्याचे डॅमेज कंट्रोल कसे करता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये आता शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय जनता पार्टीने रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला राजकीय धोबी पछाड दिल्याने त्याचा परिणाम सातारा जिल्ह्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरे येथील मुक्कामी एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या निर्णयाप्रमाणे सर्वकाही होईल असे संकेत दिले होते. मात्र, भाजपने थेट विरोधात भूमिका रायगडमध्ये घेतल्याने साताऱ्यात त्याचा वचपा शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या एकीकरणातून काढला जाणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी परिपत्रक जाहीर केले आहे. परिपत्रकानुसार 20 मार्चपूर्वी सभापती व अध्यक्ष पदाच्या निवडी करावयाच्या आहेत. सहलीवर गेलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य येत्या पाच मार्चपर्यंत पुन्हा साताऱ्यात परत येतील अशी माहिती समोर येत आहे. 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून सत्तेचा निर्णय घेतला जाणार का याची राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार राजकीय मोर्चे बांधणी केली आहे महायुती की भाजपला वगळून सत्ता समीकरणे होणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम असून रायगडचा ठरलं पण अजून साताऱ्याचा ठरेना असे म्हणण्याची वेळ आली आहे.