सातारा : 'सातारा टुडे' ऑनलाइन न्यूजपेपरचे संपादक संग्राम निकाळजे लिखित 'लोकल टू ग्लोबल' पुस्तकाचे प्रकाशन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिल्याच दिवशी प्रकाशन मंचावर दिमाखदार समारंभात करण्यात आले.
संमेलनाध्यक्ष 'पानिपत'कार विश्वास पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, शिरीष चिटणीस त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला.
पत्रकार संग्राम निकाळजे यांचे हे पुस्तक लोकायत प्रकाशनने प्रकाशित केले आहे. निकाळजे यांनी 'लोकल टू ग्लोबल' अशा विस्तृत कॅनव्हासवर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, संगीत, पर्यटन, पर्यावरण, विज्ञान अशा नानाविध विषयांची या पुस्तकात रोचक पद्धतीने मांडणी केली आहे. यातील पानापानात ज्ञान, अनुभव, माहितीचा समृद्ध खजिना आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आदी मान्यवरांनी याप्रसंगी या लेखन कार्याबद्दल निकाळजे यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार गजानन चेणगे, प्रा. प्रकाश कांबळे, रमेश जाधव, महेश शिंदे, समरजीत निकाळजे आणि मान्यवर उपस्थित होते.