सातारा : सातारा शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बंद पडलेली अनेक वाहने धुळखात पडून असून या वाहनांमुळे आधीच वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेले सातारा शहर आता आणखीनच विद्रूप दिसू लागले असून कुठे नेऊन ठेवला आहे सातारा माझा असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. सातारा शहर वाहतूक शाखेने संबंधित वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे.
सातारा शहरातील अरुंद रस्त्यांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाली असले तरी त्यामुळे केवळ पोवई नाका परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. प्रत्यक्षात मात्र सातारा शहरातील अरुंद रस्ते, वाढलेली लोकवस्ती आता शहर अंतर्गत असणारी वाहतूक कोंडीच्या समस्या जैसी थे अशीच आहे. पार्किंग तळाला पुरेशी जागा नसल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने कुठे पार्किंग करायची? असा एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातच सातारा शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावरून बंद अवस्थेत असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करून ठेवण्यात आल्यामुळे त्याचा नियमित वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. इतर वेळी नो पार्किंगमध्ये वाहने लावल्यास दंडाची कारवाई करणाऱ्या सातारा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी संबंधित रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करून ठेवणाऱ्या चालकांवर कोणतीही कारवाई करत नाहीत. ही वाहने वर्षानुवर्ष धुळखात पडली असून यासंदर्भात सातारा शहर वाहतूक शाखेने कडक पावले उचलावीत, अशी मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे.