सातारा : सातारा येथील पोलीस मुख्यालयानजीक पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’चे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील,जिल्ह्यातील खासदार आमदार,पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पोलीस मुख्यालय सातारा येथे ब्रिटिशकालीन सुमारे १०० वर्षांपूर्वीची कौलारू, बैठ्या चाळीच्या स्वरूपातील जुनी व जीर्ण निवासस्थाने राहण्यास अयोग्य व अपुरी ठरत होती. त्यामुळे ही सर्व निवासस्थाने पाडून त्या जागी नवीन,आधुनिक निवासस्थाने उभारण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आला होता.या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सदर जागेवर एकूण ६९८ निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस अंमलदारांसाठी ६७२, पोलीस अधिकाऱ्यांसाठी २४ निवासस्थाने, पोलीस उपअधीक्षकांसाठी २ स्वतंत्र बंगलो, तसेच मल्टीपर्पज हॉल, व्यायामशाळा व वाचनालयाचा समावेश आहे.
या प्रकल्पाचे बांधकाम मेसर्स हर्ष कन्स्ट्रक्शन, नाशिक यांनी पूर्ण केले.या नव्या संकुलास ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’ असे नामकरण करण्यात आले असून येथे पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी तसेच सफाई कामगारांना निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. संकुलात २ मेगावॅट क्षमतेचे सबस्टेशन, सांडपाणी व्यवस्थापनासाठी दोन एसटीपी, घनकचरा व्यवस्थापन युनिट उभारण्यात आले आहेत.संकुलाची स्वच्छता, साफसफाई व बागेची देखभाल यासाठी BVG या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सुरक्षारक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.या प्रकल्पामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणार असून स्वच्छ, सुरक्षित व उच्च दर्जाच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे.