सातारा : जागतिक स्तरावर पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखले जाणारे साताऱ्यातील कास पठार व सातारकरांना नियमितपणे शुद्ध पाणीपुरवठा करणारा कास तलाव पाहण्यासाठी देश विदेशातून असंख्य पर्यटक या परिसराला भेटी देत असतात. पर्यटकांना या परिसराचा आनंद अधिक प्रमाणात लुटता यावे म्हणून या परिसरात पर्यटकांना निवासासाठी व भोजन व्यवस्थेसाठी या ठिकाणी बंगल्याची उत्तम सोय केली होती. मात्र, काही विघ्नसंतोषी व मद्यपी प्रवृत्तीच्या लोकांकडून या बंगल्याची नासधूस केली. यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा बंगला कुलूपबंद झाला आहे. त्यामुळे या बंगल्यातील दारे खिडक्या गंजून गेल्या आहेत. बंगला बंद असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.
निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेल्या या परिसरात पर्यटक निसर्गप्रेमी जीवनाचा मुक्त व स्वच्छंदीपणे आनंद लुटतात. पर्यटकांना येथील शुद्ध हवा व निसर्गरम्य वातावरणाची भुरळ पडत असल्याने पर्यटकांची दिवसेंदिवस या परिसरात गर्दी वाढत आहे. युनेस्कोने कास पठार हे एक जागतिक वारसा संरक्षित क्षेत्रच्या यादीत समावेश केल्यामुळे साताऱ्याचे नाव आता जगाच्या नकाशावर पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. निसर्गाचा स्वच्छंदी आनंद घेण्याबरोबरच आता या परिसरात नव्याने जलाशयातून पर्यटकांना आनंद लुटण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. बोटिंगमधून मुक्तपणे जलसंचाराचा आनंदही आता पर्यटकांना मिळू लागला आहे. पर्यटकांना या परिसराचा आनंद अधिक प्रमाणात लुटता यावे म्हणून या परिसरात पर्यटकांना निवासासाठी व भोजन व्यवस्थेसाठी या ठिकाणी बंगल्याची उत्तम सोय केली होती.
मोकाट श्वान व जनावरांच्या आश्रय केंद्र
देखभाली अभावी बंगल्याची दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी दगडी रेखीव वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. एकेकाळी पर्यटकांचा हक्काचा निवारा म्हणून ही वास्तू उपलब्ध असताना आता या वास्तूमध्ये मोकाट श्वान व जनावरांच्या आश्रयांचे केंद्र बनले आहे. कास येथील बंगल्यामुळे निसर्गप्रेमींची व पर्यटकांना निवासाची सोय होत होती. त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी विश्रांतीची सोय झाली होती. परंतु अनेक वर्षापासून हा बंगला कुलूप बंद झाल्याने पर्यटकांची गैरसोय होत होत आहे.
बंगला कुलूपबंद असल्याने पर्यटकांची गैरसोय
सातारच्या पर्यटन क्षेत्राला अधिक गती मिळावी म्हणून कास पठार व निसर्गरम्य परिसराला पर्यटकांनी अधिकाधिक भेटी द्यावेत म्हणून खा. उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या परिसरात अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याचबरोबर या भागातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून या परिसराला त्यांनी विकासाची गती दिली आहे. त्यामुळे या परिसरात उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परंतु, काही विघ्न संतोषी व अपप्रवृत्तीच्या मंडळीकडून वंगल्याच्या झालेल्या नासधुसमुळे गालबोट लागत आहे. बंगला कुलूपबंद असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.