कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा वर्षांपासून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले असून गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हेच आपले प्रमुख ध्येय आहे, कायद्याच्या राज्यावर दबाव आणण्याचा, झुंडशाहीने प्रशासनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. कोरेगावमध्ये कायद्याचे राज्य आहे आणि तेच कायम राहील,” असा इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि काही स्थानिक पोलीस अंमलदारांवर आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर कोरेगाव शहरासह मतदारसंघातील राजकीय वातावरणात चांगलेच तापले आहे. \
या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांनी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता थेट पोलीस उपअधीक्षक कार्यालयात धडक देत विरोधकांच्या झुंडशाहीविरुद्ध तीव्र निषेध नोंदवला. प्रशासनावर आणल्या जात असलेल्या राजकीय दबावाचा मुद्दा ठळकपणे मांडला आणि पोलिस अधिकाऱ्यांना निःष्पक्षपणे काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश यादव, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे, हणमंतराव जगदाळे, नवनाथ केंजळे, रमेश माने, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, ॲड. अशोकराव वाघ आणि ॲड. भैय्यासाहेब जगदाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पीडित नागरिकांनी उपअधीक्षक राजश्री तेरणी यांना विरोधकांकडून झालेल्या अन्यायाची माहिती दिली. त्यांनी दाखल गुन्ह्यांचे तपशील, झालेला छळ आणि दबाव तंत्राचे प्रत्येकी उदाहरण सांगितले. प्रत्येक गुन्ह्यात विशिष्ट पद्धतीने त्रास दिला जातो, अशी ठोस उदाहरणे देत नागरिकांनी विरोधकांच्या दबावाच्या राजकारणावर रोष व्यक्त केला. या चर्चेदरम्यान पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले आणि अन्य पोलिस अंमलदारही उपस्थित होते.