भांबवली-वजराई धबधबा पर्यटकांसाठी खुला

वनविभागाकडून सुरक्षिततेसाठी उपाययोजना

by Team Satara Today | published on : 05 June 2025


कास : ऐन उन्हाळ्यात धुवाधार पावसाने छोटे-मोठे धबधबे फेसाळू लागले आहेत. पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली- वजराई धबधबा चांगलाच फेसाळला आहे. रोहोट वनपाल राजाराम काशीद यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३१) धबधबा पर्यटन हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.

निसर्गप्रेमी पर्यटक आतुरतेने वाट पाहात असतात तो भांबवली- वजराई धबधबा पर्यटकांसाठी खुला झाला आहे. राजाराम काशीद यांनी ७० रुपये भरून पर्यटन शुल्कची पावती घेतली. या वेळी वनरक्षक सुनील शेलार व तुषार लगड, तसेच हरिभाऊ मोरे, जगन्नाथ मोरे, चंद्रकांत मोरे, हनुमंत मोरे, शंकर शेलार, शंकर साळुंखे, संतोष मोरे, तानाजी जाधव, विठ्ठल माने, दिलीप मोरे, फुलाबाई मोरे, सावित्राबाई मोरे उपस्थित होते.

वन खात्याच्या नियमानुसार, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धबधब्यावर जाणाऱ्या पायवाटा बंद केल्या असून, जागो-जागी सूचना फलक लावले आहेत. पर्यटकांनी निसर्गाची हानी करू नये, स्वच्छता राखावी याची खबरदारी घेण्यासाठी समितीने सेवक नेमले आहेत.

हुल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्यासाठी जागोजागी वन विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. धबधबा ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांनी भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घ्‍यावा, असे आवाहन संयुक्त वनव्यवस्थापन समिती, भांबवली यांनी केले आहे.

धबधब्याचा हंगाम सुरू झाला असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांनी दारू पिऊन हुल्लडबाजी करू नये, शुल्क फी द्यावी, स्थानिकांशी हुज्जत घालून त्रास देऊ नये, सूचनांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी प्रवेश करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

- राजाराम काशीद, वनपाल. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘वसुंधरेच्या संवर्धनासाठी’ गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडा
पुढील बातमी
डोळ्यांनी कमी किंवा धुसर दिसण्याची कारणे

संबंधित बातम्या