मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच अहमदाबादमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ७०व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२५मध्ये छाया कदम यांचा सन्मान करण्यात आला. 'लापता लेडीज' या चित्रपटामध्ये साकारलेल्या 'मंजू माई' या पात्रासाठी 'सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री' हा फिल्मफेअरचा मानाचा पुरस्कार छाया कदम यांना मिळाला.
'मंजू माई'च्या भूमिकेला मिळालेल्या या मोठ्या सन्मानामुळे मराठी चित्रपटसृष्टीची मान अभिमानाने उंचावली आहे. या पुरस्काराची घोषणा होताच, छाया कदम यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा क्षण छाया कदम यांच्यासाठी खूपच खास होता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा छाया कदम स्टेजवर गेल्या, तेव्हा तिथे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान उपस्थित होता. भावूक झालेल्या छाया यांना शाहरुखनं धीर देत मीठी मारून त्यांचं कौतुक केलं. ऐवढंच नाही शाहरुखनं स्वत: छाया यांना मंचावरून खाली नेऊन सोडलं.
यावेळी छाया कदम म्हणाल्या, "प्रत्येकवेळी असं वाटायचं की आता मला पुरस्कार मिळेलच. सगळेजण कौतुक करायचे, पण पुरस्कार काही मिळत नव्हता. यावेळी विचार करून ठेवला होता, अवॉर्ड मिळो न मिळो… छान तयार होऊन आपण या सोहळ्याला जायचं. खूप आभार... किरण आय लव्ह यू…तू माझ्यावर इतका विश्वास ठेवलास. एका मराठी मुलीला तू युपीमधली मंजू माई बनवलंस…मला स्वत:ला खात्री नव्हती की, मी खरंच ही भूमिका करेन की नाही. पण, किरण तू नेहमी मला विश्वास दिलास. हा पुरस्कार त्या सगळ्यांसाठी आहे जे लोक इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे काम करत आहेत आणि नेहमी विचार करतात…कधी होणार? कधी पुरस्कार मिळेल? मेरा टाइम कब आएगा? त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे".