सातारा : भरधाव ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकजण जागीच ठार तर सात जण जखमी झाले आहेत. फलटण तालुक्यातील बरड गावच्या हद्दीत पालखी मार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकत आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मिनी टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक (एम एच ०५-एफजे-९७०५ भरधाव वेगात पालखी मार्गावरून पंढरपूरकडे निघाली होती. फलटण तालुक्यातील बरड गावच्या हद्दीत एका छोट्या वळणावर ट्रॅव्हल्स थेट दुभाजकावर जाऊन आदळली. चालकाचा भरधाव गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. रस्ता ओलांडणारा जालिंदर लक्ष्मण सस्ते (रा. बरड, ता. फलटण ) हे अपघातात जागीच ठार झाले. तर सात जण जखमी झाले आहेत. एक शाळकरी तरुण या अपघातातून बालंबाल बचावला असल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजवरून दिसून येत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर नेहमीच मोठी रहदारी असते. रस्त्याकडेच्या थांब्यावर प्रवासी उभे असतात. त्यामुळे या मार्गावर अनेकदा मोठ्या अपघातांमध्ये नागरिकांचा बळी गेला आहे. बरड इथं झालेल्या अपघातावेळी देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक उभे असल्याचे दिसत आहे. दोघेजण रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभे होते. त्याचवेळी भरधाव मिनी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळली. त्यामध्ये एक जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्समधील सात जण जखमी झाले आहेत. फलटण पोलिसांनी अपघात स्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात दाखल केला आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालक दीपक कुमार (रा. देविदिन मलीपूर,संत रविदासनगर, उत्तरप्रदेश ) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, सातारा, पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर वारंवार भीषण अपघात होत आहेत. या वर्षात झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरीकांचा बळी गेला आहे. विविध उपाययोजना करूनही अपघातांचे सत्र थांबलेलं नाही. त्यामुळे पालखी मार्ग अपघातांचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. पंढरपूरला भाविक वरचेवर देवदर्शनासाठी जात असतात. त्यांच्या वाहनांचे देखील यापूर्वी भीषण अपघात झाले आहेत.