अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर

by Team Satara Today | published on : 23 June 2025


सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री स्वर्गिय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोंसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य मोबदला मिळावा, तालुक्यात हरित क्रांती व्हावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने उभारलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी करून अनेक नामांकित पुरस्कार मिळवले आहेत. अजिंक्यतारा कारखान्यास देश पातळीवरील साखर उद्योगाशी सलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जाहीर झालेला पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे भारतीय शुगर्सचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी सांगीतले आहे.

राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पथावर असलेल्या अजिंक्यतारा कारखान्यास सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र विक्रमसिंह शिंदे यांनी समक्ष भेटून कारखान्याचे चेअरमन यशवंत हरी साळुंखे व व्हाईस चेअरमन नामदेव विष्णू सावंत यांचेकडे सुपुर्त केले आहे. या प्रसंगी भारतीय शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते तसेच कारखान्याचे खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते.

भारतीय शुगर्सचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, १९७५ पासून सदर संस्था कार्यान्वीत असून सुरुवातीला साखर कारखान्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत होती. सध्या संस्था त्रयस्थाच्या भूमिकेतून सहकारी तसेच खाजगी साखर कारखाने व तेथील अधिकारी जे चांगले काम करीत आहेत त्यांना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहित करणेचे काम करीत आहे. साखर कारखानदारीमध्ये येत असलेल्या नव-नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे, विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करणेचे काम संस्था करीत आहे. अजिंक्यतारा कारखान्यास जाहीर झालेला पुरस्कार हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम पुरस्कार असून त्याचे स्वरुप १ लाख रुपये रोख, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र असे आहे. सदरचा पुरस्कार अजिंक्यतारा कारखान्यास दिनांक १८ जुलै २०२५ रोजी समारंभ पुर्वक कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगीतले.

सदर पुरस्कार मिळाल्याबददल कारखान्याचे मार्गदर्शक ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, कारखान्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळ यांनी सर्व सभासद, बिगर सभासद, अधिकारी, कामगार- कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे.

कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहिते यांनी यावेळी सांगीतले की, कारखान्याने सुरुवाती पासून शेतकऱ्यांचे हित जोपासलेले आहे. कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्यावर विश्वास दाखवून ऊसाचा पुरवठा केला असून त्या विश्वासास संचालक मंडळ पात्र राहिलेले आहे. कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमता २५०० मे.टनावरुन ४५०० मे.टन केली, तसेच आसवणी क्षमता ३० हजार लिटर्स प्रतिदिन वरुन ४५ हजार लिटर्स केलेली आहे. त्याच प्रमाणे कारखान्यामध्ये स्टीमचा वापर कमी करणे, पाण्याचा वापर कमी करणे, बगॅस बचत करणे, पर्यावरण संतुलन राखणे, साखरेची प्रतवारी सुधारणे इ. तांत्रिक कामे केली आहेत. तसेच शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट वेळेत देण्याची परंपरा राखलेली आहे. या बाबींचा विचार करुन भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेने देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे. कारखान्याचे सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच हितचिंतक यांचे सहकार्य लाभलेले असून सदर पुरस्कार हा त्यांना समर्पित करण्यात येत आहे. कारखान्याच्या कार्याची दखल घेवून अजिंक्यतारा कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २९ पुरस्कार मिळालेले आहेत. या जाहीर झालेल्या ३० व्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नांवलौकीकात भर पडली असून शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कारखाना परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का
पुढील बातमी
९९ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची बुधवारी नियोजन बैठक

संबंधित बातम्या