विकास सोसायट्यांचे सचिवांची केडर संरचना अंमलबजावणीमध्ये सातारा जिल्हा बँक राज्यात अग्रेसर - खा. नितीन पाटील

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा  :  प्रा. वैद्यनाथन समितीच्या शिफारशीमुळे बरखास्त झालेल्या केडर संरचनेचे पुनर्स्थापना करण्यासाठी राज्य शासनाने कायद्यात बदल करुन केडर संरचनेची पूर्वीप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी आदेश काढले. मा. सहकार आयुक्त कार्यालयाने जिल्हास्तरीय सचिवांचा केडरमध्ये समावेश करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्याप्रमाणे मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी जिल्ह्यातील ५५७ जिल्हास्तरीय सचिवांना केडरमध्ये समावेश करण्याची अमलबजावणी पूर्ण केली.

केडरमध्ये नव्याने समावेश झालेल्या जिल्हास्तरीय सचिवांना त्यांची जबाबदारी व नोकरी नियम यांची माहिती देण्यासाठी सातारा जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली होती. कार्यशाळेस बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, राज्याचे बांधकाम मंत्री . शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री  मकरंद पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सर्व संचालक, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, जिल्हा केडर सचिव संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम, संघटनेचे पदाधिकारी, बँकेचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेस उपस्थिती होते.

खा. नितीन पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये राज्यात जिल्हा केडर अमलबजावणी प्रक्रिया सर्वात प्रथम पूर्ण केल्याबद्धल प्रशासन अधिकाऱ्यांचे कौतुक केले. प्रा. वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनंतर केडर बरखास्त झाले होते. केडर असावे यासाठी कै. विलासराव पाटील-उंडाळकर (काका), कै. लक्षमणराव पाटील(तात्या), भाऊसाहेब महाराज यांनी प्रयत्न केले व कोर्टामध्ये अपील दाखल केले होते. कोर्टाकडून स्थगिती आलेने सातारा जिल्ह्याचे केडर अस्तित्वात होते. तथापि, वैद्यनाथन शिफारशी झाल्यानंतर संस्थाना अति स्वायत्तता मिळाली. विकास सेवा संस्थाचे संचालक मंडळाला सचिव नियुक्तीचे अधिकार मिळाले मुळे सचिवांची नोकरीची शाश्वती राहिली नव्हती.  तसेच सचिवांना मिळणाऱ्या  पगाराची अनियमितता प्रॉ. फंड ग्रॅच्यूटी, विमा, पेन्शन इत्यादी सुविधा मिळत नसलेने सचिवांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण होते. त्यामुळे संस्थांच्या व्यवसायावर व सेवेवर विपरीत परिणाम होत होता. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जवळपास ४ हजार कोटीचे कर्ज पुरवठा सोसायटी सभासदांना होत आहे. हा कर्ज पुरवठा सुरक्षित राहावा व सचिवांनाही आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्दात हेतूने केडर पूर्ववत सुरु करण्यासाठी रामराजे साहेब,  शिवेंद्रसिंहराजे (बाबा),  मकरंद पाटील (आबा), बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सतत पाठपुरावा केल्यानेच राज्य शासनाने केडर संरचना अंमलबजावणी बाबत सकारात्मक निर्णय घेतलेचे नमूद केले. सचिव व बँक अधिकारी यांचे बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान आहे. रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांनी जिल्हा बँकावर कडक निर्बंध लागू केले असलेने सर्वांनी गुणात्मक कामकाज करण्याचे गरज असल्याचे मत खा. नितीन काका पाटील यांनी व्यक्त केले.

बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केडर पूर्ववत सुरु करण्यासाठी बँकेचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. सचिवांचे जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त होणार आहे. सचिवानी गुणात्मक काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सचिवानी आपले कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेऊन निष्ठापूर्वक कामकाज करून शेतकऱ्यांना उच्च दर्जाची सेवा देणेचे आवाहन केले. 

बँकेचे संचालक मा. श्री.सुनील खत्री यांनी केडर पुनर्स्थापना होणेसाठी बँकेच्या ज्येष्ठ संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे योगदान आहे. केडर असणे हे बँकेच्या हिताचे दृष्टीने महत्वाचे आहे. केडर मुळे सचिवांची जबाबदारी वाढलेली आहे. सचिवानी नोकरी नियमाचे पालन करून संस्थेच्या विकासाचे दृष्टीने जबाबदारीने कामकाज करण्याची गरज आहे. सचिवानी स्थानिक पातळीवर हितसंबंध न जपता बँकेचे व संस्थेचे हित जपणेसाठी कां करणेची अपेक्षा व्यक्त केली. सोसायटी संगणकीकणामुळे जलद व बिनचूक सेवा शेतकऱ्यांना द्यावी. संगणकीकरण कामकाज अद्यावत ठेवणेची सूचना करून चांगले कामकाज करणाऱ्या सचिवांचा सन्मान केला जाईल असे नमूद केले.  

जिल्हा उपनिबंधक श्री. सुद्रिक म्हणाले, जिल्हास्तरीय सचिवांचा केडरमध्ये समावेश झाल्याने एक शाश्वत  नोकरीची संधी निर्माण झालेली आहे. संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने सचिवानी संस्था कार्यक्षेत्रात व्यवसाय सुरु करण्याची गरज आहे. केंद्राने सर्व विकास सेवा संस्थाना एकच पोटनियम लागू केले आहेत त्याचे वाचन सचिवानी केले म्हणजे संस्था कामकाज पोट नियमानुसार करण्याची आवश्यकता आहे. केंद्राचे  सोसायटी संगणकीकरण प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे कामकाज जिल्ह्यात पूर्ण झालेले आहे. सचिवानी दररोज संगणकावर कामकाज पूर्ण करून DayEnd रोजचे रोज देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. केडर मध्ये समावेश झाल्यानंतर सचिवांना चांगले आर्थिक लाभ मिळत आहेत यामध्ये सातत्य ठेवणेसाठी किंबहुना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संस्थेचा फायदा करणे आवश्यक असलेचे स्पष्ट करताना कर्ज व्यवहारावरच अवलंबून न राहता इतर व्यवसाय करणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, वसुलीवर लक्ष ठेवणेची आवश्यकता विषद केली. 

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे  यांनी आपली मनोगतात केडर संरचना पुन्हा अंमलात आणणेसाठी बँकेला खूप प्रयत्न करावे लागले. राज्यात सर्वात प्रथम आपले जिल्ह्यात केडर अंमलबजवणी झाल्याने  विशेष आनंद होत आहे. सचिवांना चांगले पगार झालेले आहेत. सचिवांना नोकरी नियम, रजा नियम, वेळेचे बंधन लागू झालेले आहेत. सचिवांना प्रॉ. फंड, ग्रॅच्युटी, मेडिक्लेम सुविधा दिलेल्या आहेत. सचिवानी बँकेच्या कर्जाच्या योजना सभासदांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. बँकेमार्फत बँक पातळीवर १०० टक्के व संस्था पातळीवर १०० टक्के वसुली  झालेल्या संस्थाना प्रती वर्षी वसुली प्रोत्साहन, वसूली गौरव रक्कम आदा करण्यात येते. संस्थांच्या भाग भांडवलावर सातत्याने १२ टक्के लाभांश दिला जात असलेने बँकेच्या माध्यमातून संस्थाना जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न देणेच प्रयत्न केला जात आहे. यामुळे संस्थाना प्रेरणा मिळून वसुली प्रभावी होते. तसेच थकबाकीचे प्रमाण घाटात असलेने संस्था सक्षम होत आहेत.  संस्था प्रोत्साहनात्मक रक्कम बँक शेअर्स मध्ये गुतंवणूक करत असल्याने बँक लाभांश रकमेच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होत आहे. बँकेमार्फत संस्था सचिव व पंच कमेटी सदस्य यांना वेळोवेळी संस्था कामकाज नविन तंत्रज्ञान, व्यवसाय वृद्धी इत्यादी अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. बँकेने नफ्यातून संस्था सक्षमीकरण, सभासदांना व्याज परतावा, सचिवांना बक्षीस पगार इत्यादीच्या माध्यामतून कायम आर्थिक मदत केलेली आहे. सचिवांचे पगार वर्गणीत सहभागासाठी संस्थांनी केलेल्या कर्ज वाटपाच्या प्रमाणत शेकडा ०.१५ टक्के प्रमाणे सुमारे ४ ते ५ कोटी रुपये बँकेकडून वर्गणी देण्यात येणार असल्याने संस्थांचा भार कमी होणार आहे. सचिवानी आपले संस्था कार्यक्षेत्रात जे व्यवसाय करता येणे शक्य होईल असे व्यवसाय करून संस्थाची आर्थिक  प्रगती करण्याचे मत व्यक्त  केले.

सचिव संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांनी बँकेने सचिवासाठी पगार वाढ चांगली दिल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष, संचालक ,मुख्य कार्यकरी अधिकारी यांचे विशेष आभार मानले. सर्व सचिवानी नोकरी नियमाचे पालन करून संस्थेच्या व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी चांगली सेवा सर्व सचिव देतील यासाठी संघटना म्हणून आम्ही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा व सूचनांची पूर्तता करणेचे आवाहन सर्व सचिवांना करून सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यशाळा संपलेचे जाहीर केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात आजपासून भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती - जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले यांची माहिती
पुढील बातमी
ऑलिंपिक वीर स्व. पै. खाशाबा जाधव यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी; पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे नामकरण “स्व. पै. खाशाबा जाधव पोलीस क्रीडा प्रबोधिनी

संबंधित बातम्या