सातारा : पी.एम. युवा योजनेतंर्गत साताऱ्यातील ध्रुव पटवर्धन याने अपरिचित स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारी डॉ.वासुदेव विश्वनाथ आठल्ये यांचे जीवन चरित्र लिहिले होते. त्याबद्दल त्याला तीन लाखांची स्कॉलरशिप मिळाली होती. तसेच त्याने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने नुकतेच झाले होते. योगायोग म्हणजे साताऱ्यातील जनता सहकारी बँकेची मुख्य इमारत ज्या जागेवर उभी आहे त्या जागेत स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. आठल्ये हे राहण्यास होते. साताऱ्यातील या युवा लेखकाने मिळवलेल्या यशाचे कौतुक जनता सहकारी बँकेच्यावतीने त्याचा सत्कार करुन करण्यात आले. भागधारक पॅनेलचे प्रमुख, ज्येष्ठ संचालक विनोद कुलकर्णी, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी त्याचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ध्रुव पटवर्धन हा येथील डी.जी. कॉलेजमध्ये बी.कॉमच्या व्दितीय वर्षात शिकत आहे.
यावेळी मान्यवरांना माहिती देताना ध्रुव पटवर्धन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये अपरिचित स्वातंत्र्यसैनिकांबद्दल माहिती असल्यास त्यांचे चरित्र लिहिण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी पी.एम. युवा स्कीम जाहीर केली होती. यामध्ये देशभरातून १६ हजारपेक्षा जास्त युवकांना भाग घेतला. त्यातील १२५ जणांची निवड करण्यात येऊन त्यांच्या मुलाखती झाल्यानंतर ७५ लेखकांची निवड करण्यात आली, त्यात साताऱ्यातून माझी निवड झाली. ३ लाखांची स्कॉलरशीप मिळून ६ महिन्याचे प्रशिक्षण झाले.
या दरम्यान देशातील नामवंत लेखकांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यात बाहुबली चित्रपटाचे लेखक आनंद निळकंठन, विक्रम संपत, पत्रकारांचा समावेश होता. सहा महिन्यात मी साताऱ्यातील अपरिचित स्वातंत्र्यसैनिक डॉ. वासुदेव आठल्ये यांचे जीवन चरित्र लिहून पूर्ण केले. यासाठी मला वडिलांचे मित्र केदार गाडगीळ तसेच नगरवाचनालयाचे सहकार्य मिळाले. १३१ पानी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन नॅशनल बुक हाऊसच्यावतीने मान्यवरांच्या उपस्थितीत झाले असून त्याचे भाषांतर आता भारतातील प्रमुख भाषांमध्ये होणार आहे. योगायोग म्हणजे जनता सहकारी बँकेची मुख्य इमारत ज्या जागेवर उभी आहे, तिथे स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. आठल्ये याचे घर होते. डॉ. आठल्ये यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असल्यास dspkirtan@gmail.com संपर्क साधावा.