सातारा : सातारा शाहुनगर, गोडोली येथील गुरूकुल स्कूलची माजी विदयार्थीनी सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय धावणे स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले. कु. सुदेष्णा हणमंत शिवणकर ही गुरूकुल स्कूलमधून वर्ष 2018-19 या शैक्षणिक वर्षातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाली होती. नुकत्याच संपन्न झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय धावणे क्रीडास्पर्धेत कु. सुदेष्णा हिने यश संपादन केले.
चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ चॅम्पियनशिप स्पर्धेत 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कांस्यपदक व 4 x 100 मीटर रिले धावणे प्रकारात रौप्यपदक मिळविले. त्याचप्रमाणे तेलंगणा येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय खुल्या अथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर व 200 मीटर धावणे क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
यावेळी गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सुदेष्णा शिवणकर हिचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे व हणमंत शिवणकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र चोरगे म्हणाले, सुदेष्णा शिवणकर हिने मिळविलेले यश हे भारत देशाबरोबरच सातारा व गुरूकुल स्कूलसाठी गौरवाची बाब आहे. कु. सुदेष्णाचे खेळातील सातत्य, चिकाटी व प्रयत्नाबरोबरच पालकांचा भक्कम पाठींबा यामुळे ती या यशापर्यंत पोहोचली. आॅलंम्पिक स्पर्धेमध्ये तिने सहभागी होवून देशासाठी सुवर्णपदक आणावे अशी गुरूकुलचे पालक व विद्यार्थ्यांच्यावतीने इच्छा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
यावेळी सचिव आनंद गुरव, अर्जुन चोरगे, मधुकर जाधव, अॅड. ऐश्वर्या चोरगे, माध्यामिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल, हरिदास साळुंखे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी कु. सुदेष्णा हिला शुभेच्छा दिल्या.