साहित्य संमेलनासाठी वाहतूक बदलांचा आराखडा; नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे - पोलिस अधीक्षक तुषार दोशी

by Team Satara Today | published on : 31 December 2025


सातारा  : सातारा येथील शाहू स्टेडियमवर दि. १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत महत्त्वाचे व तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. संमेलन काळात होणारी गर्दी व संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.

हे वाहतूक बदल दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री १२.०५ वाजल्यापासून ते दि. ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. पोवई नाका, राधिका सिग्नल, एसटी स्टँड, शाहू स्टेडियम व भूविकास चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, एसटी बस, शासकीय वाहने व रुग्णवाहिकांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे.

वाहतुकीस बंद असलेले मार्ग : पोवई नाका व राधिका सिग्नलकडून बसस्थानक मार्गे भूविकास चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना भूविकास चौकातून पुन्हा बसस्थानकाकडे वळण्यास मनाई. मोळाचा ओढा व करंजे नाका येथून शाहू स्टेडियमसमोरून बसस्थानकाकडे जाण्यास मनाई. वाढे फाटा येथून भूविकास चौक मार्गे शाहू स्टेडियम व बसस्थानकाकडे जाण्यास मनाई. भूविकास चौकातून थेट बसस्थानकाकडे जाण्यास मनाई.

पर्यायी वाहतूक मार्ग : पोवई नाका, राधिका सिग्नल व बसस्थानक परिसरातून येणारी वाहने जुना आरटीओ चौक - पारंगे चौक - हजेरीमाळ मैदान मार्गे बसस्थानकाकडे जातील. मोळाचा ओढा, करंजे नाका व वाढे फाटा येथून बसस्थानकाकडे येणारी वाहने जुना आरटीओ चौक, पारंगे चौक व हजेरीमाळ मार्गे येतील.पारंगे चौक ते बसस्थानक हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी राखीव राहील.

पार्किंग व्यवस्था : हजेरीमाळ मैदान - चारचाकी वाहने, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (शाहू स्टेडियमसमोर)  दुचाकी कंग्राळकर असोसिएट (लँडमार्क) मोकळी जागा- दुचाकी व चारचाकी, पोलीस परेड मैदानाजवळील रस्ता दुचाकी, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय परिसर दुचाकी व चारचाकी अशी असणार आहे.

साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी नागरिकांनी संयम बाळगून पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विश्वास पाटील यांनी दिला साहित्यिकांच्या स्मृतींना उजाळा; थोर साहित्यिक आणि महापुरुषांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन
पुढील बातमी
कापड दुकानात घुसून टोळक्याचा प्राणघातक हल्ला; अंबवडे येथील घटना, तिघांची प्रकृती गंभीर

संबंधित बातम्या