RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

डॉ. मोहन आगाशे यांना भावे पदक

06 October 2018 at 17:31

सांगली : नाट्यक्षेत्रात मानाचे समजले जाणारे आद्यनाटककार विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर करण्यात आले. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी याबाबतची घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. रंगभूमीदिनी ५नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते पदक प्रदान सोहळा होणार आहे. 

डॉ. कराळे म्हणाले, 'रंगभूमीसाठी प्रदीर्घ काळ योगदान देणाऱ्या गुणवंत कलाकाराला भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदाचे हे त्रेपन्नावे वर्ष आहे. गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पंचवीस हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मानसशास्त्र वैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर प्राध्यापक आणि पुण्यातील ससून रुग्णालयात मानसोपचारतज्ञ म्हणून सेवा देणारे डॉ. मोहन आगाशे यांचा लहानपणापासूनच रंगभूमीकडे ओढा होता. सई परांजपे यांच्या बालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पण केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन पातळीवरही रंगभूमी गाजविली. राज्य नाट्य स्पर्धेतील 'डाकघर' या नाटकातून त्यांचे अभिनय कौशल्य सर्वदूर पोहोचले. पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या 'धन्य मी कृतार्थ' आणि 'अशी पाखरे येती,' या नाटकांतील त्यांच्या भूमिकांनंतर दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी त्यांना विजय तेंडूलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल'मधील नाना फडणवीसाची भूमिका दिली. सलग वीस वर्षे हे नाटक रंगभूमीवर गाजत राहिले. तब्बल ८०० प्रयोगांपर्यंत पोहचलेले हे नाटक परदेशी रंगभूमीवर नेण्यात डॉ. आगाशे यांचे योगदान मोठे आहे.' 

ते म्हणाले, 'चित्रपटक्षेत्रात डॉ. आगाशे यांचे पदार्पण १९७५ मध्ये 'सामना' या चित्रपटातील मारुती कांबळे या छोट्या भूमिकेतून झाले. परंतु त्यांच्या कारकीर्दीला झळाळी मिळाली ती 'जैत रे जैत,' या चित्रपटामुळे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजविली. २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन यंदाचे पदक त्यांना जाहीर करण्यात आले.' 

यावेळी समितीचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह वि. ज. ताम्हणकर, मेधाताई केळकर, जगदीश कराळे, प्राचार्य भास्कर ताम्हणकर, विलास गुप्ते, बलदेव गवळी आदी उपस्थित होते.