RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

राहुल, धोनीचा शतकी सराव; ४ नंबरवर राहुलची प्रबळ दावेदरी

29 May 2019 at 15:34

कार्डिफ : पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडकडून मार खाल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या भारतीय संघाने दुसर्‍या सराव सामन्यात बांगलादेशवर 95 धावांनी मोठा विजय मिळविला.  या सामन्यात के. एल. राहुल (108) आणि महेंद्रसिंग धोनी (113) या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 7 बाद 359 अशी धावसंख्या उभी केली. याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने 264 धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी जोडीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. बांगलादेशच्या मुशफिकूर रहीमची 90 धावांची झुंज अपयशी ठरली.

भारताच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या लिट्टन दास आणि सौम्य सरकार यांनी सावध वाटचाल केली. दोघांच्या सलामी अर्धशतकाच्या काठावर आली असता भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह याने सौम्य सरकार (25) आणि त्याच्या जागेवर आलेला शाकिब-अल-हसन (0) यांना पाठोपाठ बाद करून भारताला दिलासा दिला. मात्र, दास आणि मुशफिकूर रहीम यांनी तिसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विराटची चिंता वाढवली. ही जोडी फोडण्याचे काम चहलने केले. 73 धावांवर दास यष्टिचित झाला. चहलच्या पुढच्या चेंडूवर मोहम्मद मिथून शून्यावर बाद झाला. कुलदीप यादवने महमदुल्लाहचा त्रिफळा उडवला. 

बांगलादेशचे फलंदाज पाठोपाठ बाद होत असले तरी दुसर्‍या बाजूला रहीम तंबू ठोकून बसला होता. त्याची शतकाकडे सुरू असलेली वाटचाल कुलदीपने थांबवली. 90 धावांवर असताना त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर मात्र बांगलादेशी फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. त्यांचा संपूर्ण डाव 49.3 षटकांत 264 धावांत संपुष्टात आला. 

तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यातही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा आपली छाप पाडू शकले नाहीत. तिसर्‍या षटकांत भारताला पहिला धक्का बसला. मुस्तफिजूर रहमान याने शिखर धवनला एका धावेवर पायचित केले. त्यानंतर रोहित शर्मा (19) रुबेल हुसेनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. 

यावेळी मैदानावर असलेल्या विराट कोहलीला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर के. एल. राहुल आला. तो आज आश्‍वासक वाटत होता. दोघांची भागीदारी बहरत असताना विराट 47 धावांवर बाद झाला. पाठोपाठ विजय शंकर (2) मैदानात हजेरी लावून परतला. यावेळी भारताची अवस्था 4 बाद 102 झाली होती; पण त्यानंतर राहुल आणि धोनी यांची चांगलीच जोडी जमली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 164 धावांची दमदार भागीदारी रचली. 

भारताला यावेळी चौथ्या क्रमांकाचे दडपण होते. मात्र, राहुलने शतक झळकावत या स्थानाला न्याय दिल्याचे म्हटले जात आहे. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी साकारली. धोनीनेही राहुलला चांगली साथ दिली. राहुल बाद झाल्यावरही धोनीने जोरदार फटकेबाजी करीत आपले शतक पूर्ण केले. दुसर्‍या बाजूला असलेल्या हार्दिक पंड्यानेही 11 चेंडूंत 21 धावा करून आपले हात धुवून घेतले. शेवटच्या षटकांत शाकिब-अल-हसनच्या चेंडूवर धोनी बाद झाला. त्याने 78 चेेंडूंत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या साहाय्याने 113 धावा केल्या.